(Gadchiroli Rain) काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरुन वाहत आहेत.
याच पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रात्रीपासून पाऊस सुरु आहे. जिल्ह्याच्या पूर्व टोकावरील भामरागडच्या पर्लकोटा नदीचे पाणी गावात शिरल्याने अनेक घरांना पुराचा वेढा पडला आहे. प्रशासनाने बऱ्याच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले, मात्र पुराचे पाणी घरात आणि दुकानांमध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
संध्याकाळपर्यंत जिल्हाभरात 12 मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याने शेकडो गावांचा तालुका आणि जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. कोणतीही जीवित हानी होऊ नये म्हणून प्रशासन अलर्ट असल्याचे तहसीलदार किशोर बागडे यांनी सांगितले.