महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन चालू असून विरोधकांनी या अधिवेशनात पुरता धुमाकूळ घातलेला दिसत आहे. या अधिवेशनात सरकारला विरोधकांनी चांगलेच फ़ैलावर घेतल्याचे सध्या दृश्य आहे. त्यातच आज मीरा भाईंदरमध्ये मराठी भाषेच्या मुद्यावरून जो मोर्चा काढण्यात आला त्यात पोलिसांकडून परवानगी नसल्यामुळे अनेक कार्यकर्ते आणि आंदोलकांना ताब्यात घेतले गेले, याचे पडसाद आज विधीमंडळात देखील उमटल्याचे बघायला मिळाले. यावेळी सभागृहाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक अशी जुगलबंदी सध्या पाहायला मिळत आहे. राज्याच्या विविध प्रश्नांवर विरोधक सरकारला धारेवर धरत असून मराठीचा मुद्दा यामध्ये अग्रस्थानी आहे, आज या अधिवेशनाच्या सातव्या दिवशीही असाच गोंधळ विरोधाकांकडून पाहायला मिळाला.आजही विरोधी पक्षातील नेते सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक होताना दिसले. त्यातच आज विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर बसून सभागृहात जाणाऱ्या सत्ताधारी पक्षातील प्रत्येक नेत्याला टार्गेट केले. प्रत्येक नेत्यासंदर्भात विरोधकांनी वेगवेगळ्या मुद्यावरून घोषणाबाजी केली.
शिंदेंच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले सभागृहात प्रवेश करत असताना पायऱ्यांवर आल्यावर विरोधकांकडून 'ओम भट स्वाहा'च्या जोरदार घोषणा देऊन हातवारे करण्यात आले. तर आदित्य ठाकरेंनी भरात गोगावलेंची टॉवेल लावण्याची हुबेहूब नक्कल करत त्यांना डिवचले.भरत गोगावले यांच्या एंट्रीलाच "ओम भट स्वाहा" च्या नाऱ्यामुळे ते सुरुवातीला काहीसे रागातच ते होते मात्र नंतर त्यांनी विरोधकांना हात उंचावून अभिवादन करून हसतच सभागृहात प्रवेश करताना दिसले.
विधिमंडळामध्ये अद्याप विरोधी पक्षनेते पद दिले जात नसल्याने विरोधकांनी सरकारचा निषेध नोंदवला असून आज सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांना विरोधकांनी टार्गेट करत सभागृहाच्या पायऱ्यांवर बसून त्यांची खिल्ली उडवली. मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात कोंबडी चोरांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय' तर मंत्री संजय शिरसाठ यांच्या विरोधात 50 खोके एकदम ओके, भ्रष्टाचारी सरकार अश्या घोषणा देण्यात आल्या. तसेच माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर पायऱ्यांवरून जात असताना शाळेचे युनिफॉर्म गेले कुठे... गुजरातला आणि उपसभापती नीलम गोऱ्हे गोऱ्हेंच्या एन्ट्रीला मर्सिडीज एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या.