भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था (बीएचआर) गैरव्यवहार प्रकरणी मंगळवारी नाशिक येथून मुख्य संशयित सुनील झंवर याला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. झंवर याच्या अटकेनतंर भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन देखील अडचणीत येतील अशा चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांवर आता गिरीश महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
जळगावमधील बीएचआर पतसंस्थेत कोट्यवधींचा घोटाळा झाला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुनील झंवरला मंगळवारी नाशिक येथून अटक केली. गेल्या चार महिन्यांपासून झंवर हा फरार होता. नाशिकमध्ये एका घरात तो लपून बसला होता. अखेर त्याला बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखेला यश आलंय. झंवरच्या कार्यालयात बनावट शिक्के, कागदपत्रे…२११ कोटींच्या हिशेबाच्या डायरीसह मांडसांगावीचा जमीन घोटाळा…याचे धागेदोरे झंवरच्या अटकेमुळे उघड होणार आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय म्हणून झंवर याची ओळख आहे. त्यामुळे झंवरच्या अटकेमुळे महाजन यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते.
दरम्यान सुनील झंवर हे माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जात असताना गिरीश महाजन यांनी सुनील झंवर हे माझेच नाहीतर सर्व पक्षीय नेत्यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे कोणी नाही म्हणून दाखवावे ? असे स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी आज जळगाव येथे बोलतांना दिले आहे.