बीडच्या परळीतील गोपीनाथ गडावर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी होत आहे. पहिल्यांदाच या जयंतीनिमित्त मुंडे बहीण भाऊ एकत्र उपस्थित राहणार आहेत. पंकजा मुंडे विधान परिषदेवर आमदार झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होतोय. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर गोपीनाथ गडावर जयंती साजरी केली जाते. राज्यातून मुंडे समर्थक त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. यावर्षी गोपीनाथ गडावर जयंती साध्या पद्धतीने साजरी होत आहे.
महायुतीला राज्यात यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना गोपीनाथ गडावर निमंत्रित करण्याची इच्छा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली होती. मात्र शपथविधीच्या अनिश्चित तारखांमुळे हे होऊ शकत नाही. त्यामुळे त्याचा जंगी कार्यक्रम भविष्यात घेणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितले आहे. सामाजिक उपक्रम राबवून गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती साजरी होत आहे. साधारण अकरा वाजता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने गोपीनाथ गडावर दाखल होणार आहेत.