मुंबईतील राजकारणात ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेमुळे वातावरण तापले असतानाच भारतीय जनता पक्षाकडून पहिली आणि तीव्र प्रतिक्रिया समोर आली आहे. मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या युतीनंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (ट्विटर) एक खोचक आणि सवालांनी भरलेली पोस्ट करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.
राज्यातील महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून, त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची अधिकृत घोषणा केली. या घोषणेनंतर अवघ्या काही वेळातच आशिष शेलार यांची पोस्ट व्हायरल झाली आणि राजकीय चर्चांना नवा आयाम मिळाला.
‘जुनी भाषणे आठवतील’ असा टोला
आशिष शेलार यांनी आपल्या पोस्टमध्ये ठाकरे बंधूंच्या पूर्वीच्या भूमिकांचा दाखला देत प्रश्नांची सरबत्ती केली आहे. “मातोश्रीवर ‘विठ्ठलाला’ बडव्यांनी घेरलं होतं, पक्षाचा ताबा चार कारकुनांनी घेतला होता, असे तुम्हीच म्हणत होतात. एवढ्या मोठ्या संघटनेचा ऱ्हास होत असताना भागीदार व्हायचं नव्हतं, म्हणून सगळ्या पदांचे राजीनामे देत खुमासदार भाषणं झाली होती,” असा उल्लेख त्यांनी केला.
“आज तेच बडवे आणि तेच कारकून चालणार आहेत का? त्यांच्याबरोबर बेमालूमपणे भागीदार होणार आहात का?” असा थेट सवाल करत शेलार यांनी ठाकरे बंधूंच्या आजच्या भूमिकेवर बोट ठेवलं
‘लाव रे तो व्हिडीओ’चा टोमणा
शेलार यांच्या पोस्टमधील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरला तो म्हणजे ‘लाव रे तो व्हिडीओ’ हा टोमणा. “आता मुंबईकर तुमची जुनी भाषणं काढून आरसा समोर धरतील. तुमचा चेहरा बघून भीती नाही वाटणार का? एकत्र येऊन पालिकेची तिजोरी लुटणार नाही ना?” असे सवाल त्यांनी उपस्थित केले. नेमकं कशासाठी तेव्हा वेगळे झाला होतात? आणि आज नेमकं कशासाठी एकमेकांच्या गळ्यात गळे घालताय? असे प्रश्न मुंबईकर गल्लोगल्ली विचारतील, असा दावा करत शेलार यांनी युतीवर शंका उपस्थित केली आहे.
युतीच्या घोषणेदरम्यान राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, “कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. तिथूनच आम्ही एकत्र येण्याची सुरुवात केली.” जागावाटप आणि आकड्यांबाबत त्यांनी मौन राखत, “कोण किती जागा लढवणार, हे आम्ही आत्ता सांगणार नाही,” असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, राज ठाकरे यांनी राजकीय पक्षांमधून नेते ‘पळवणाऱ्या’ टोळ्यांवरही टीका केली आणि निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल, असे संकेत दिले.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मराठी अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला. “मराठी माणसाने बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अग्रभागी होते,” असे सांगत त्यांनी ठाकरे कुटुंबाच्या संघर्षाची आठवण करून दिली. “आज पुन्हा एकदा दिल्लीत बसलेले काही लोक मुंबई तोडण्याचे डाव आखत आहेत. अशा वेळी भांडणं करत बसलो, तर हुतात्म्यांचा अपमान होईल. म्हणून आम्ही कर्तव्य म्हणून एकत्र आलो आहोत,” असे उद्धव ठाकरे म्हणाले. मराठी जनतेला उद्देशून त्यांनी कडक इशाराही दिला“आता फुटाल, तर पूर्णपणे संपून जाल. तुटू नका, फुटू नका, मराठीचा वसा टाकू नका.”
राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार
एकीकडे ठाकरे बंधू मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र येत असल्याचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे भाजपकडून या युतीला विरोधाभासी भूमिका आणि स्वार्थी राजकारण ठरवत लक्ष्य केलं जात आहे. आशिष शेलार यांच्या पोस्टमुळे हे स्पष्ट झाले आहे की, येत्या महापालिका निवडणुकीत मुंबईतील राजकीय लढाई केवळ निवडणुकीपुरती मर्यादित राहणार नाही, तर आरोप–प्रत्यारोपांच्या फैरींनी ती अधिकच तीव्र होणार आहे.