(Trimbakeshwar Temple) श्रावण महिन्याची सुरुवात होताच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. देशातील बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या मंदिरात रोज सुमारे 20 हजार भाविक येतात. दर्शनासाठी ट्रस्टकडून देणगी स्वरूपात 200 रुपयांना पास दिला जातो. मात्र या पासचा काळाबाजार सुरू असल्याचे समोर आले असून पोलिसांनी या प्रकरणात पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे.
या टोळीने मंदिर ट्रस्टच्या अधिकृत वेबसाईटवरून बनावट नाव, मोबाईल क्रमांक आणि ओळखपत्रांचा वापर करून मोठ्या प्रमाणात पास बुक केले. हे पास त्यांनी 500 ते 1000 रुपयांपर्यंत विकले. टोळीचा “डायरेक्ट खटलं” नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप होता. ज्यामध्ये तिकिटांची माहिती एकमेकांशी शेअर केली जात होती. पोलिसांनी तपासात या टोळीचा प्रकार उघड केला असून त्यांच्याकडून आणखी माहिती घेतली जात आहे.
देवस्थान ट्रस्टने देखील याची गंभीर दखल घेतली आहे. ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी सांगितले की, वेबसाइटवर ओळख पडताळणीची व्यवस्था नाही, त्यामुळेच फसवणूक शक्य झाली. यासाठी ट्रस्टकडून वेबसाइटमध्ये तांत्रिक सुधारणा केली जाणार आहे.
पोलिसांना या टोळीमागे आणखी मोठं जाळं कार्यरत असल्याचा संशय असून हा प्रकार केवळ आर्थिक गैरव्यवहार न राहता सुरक्षा व्यवस्थेसाठीही मोठा धोका निर्माण करू शकतो, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.