मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आणखी एक धक्कादायक घडामोडी समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी 'जय महाराष्ट्र' म्हणत भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. मनसे स्थापनेपासून राज ठाकरे यांच्या विचारांशी बांधील राहिलेले आणि मुंबईतील पक्षाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे धुरी यांच्या या पक्षांतरामुळे केवळ मनसेलाच नव्हे, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नुकत्याच आकाराला आलेल्या युतीलाही मोठा धक्का बसला आहे. भाजपमध्ये प्रवेश करताना धुरी यांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि धोरणांवर जळजळीत आरोप केले आहेत.
राज ठाकरेंनी मनसे सरेंडर केली!
संतोष धुरी हे २००७ मध्ये शिवसेना सोडून राज ठाकरेंच्या मागे उभे राहिलेल्या पहिल्या पिढीतील कार्यकर्त्यांपैकी एक आहेत. त्यांनी मनसे बळकट करण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि शिवसेनेतून बाहेर पडण्यापासून नगरसेवक पदापर्यंतचा प्रवास संघर्षमय राहिला. मात्र, भाजप प्रवेशादरम्यान त्यांनी अत्यंत संतापपूर्ण शब्दांत व्यथा मांडली. "आम्ही एका झेंड्याखाली होतो, आमचे भगवे रक्त आहे. पण आज मनसेची जी युती सुरू झाली आहे, ती अशा लोकांशी झाली आहे ज्यांचे विचार हिरव्या लोकांशी जोडलेले आहेत. राज ठाकरेंनी आपला पक्ष पूर्णपणे सरेंडर केला आहे," असे धुरी म्हणाले.
जागावाटपात मनसेची बोळवण
धुरी यांच्या नाराजीचे मुख्य कारण मुंबई महापालिका निवडणुकीच्या जागावाटपातील अन्याय आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, माहीम, दादर, वरळी, शिवडी आणि भांडूप येथे मनसेची ताकद मोठी आहे. तिथे दोन-दोन जागांची मागणी केली होती, पण केवळ एकेक जागेवरच बोळवण करण्यात आली. प्रकाश पाटणकरांसारख्या नेत्यांचा वॉर्डही काढून घेण्यात आला. "ठाकरेंनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार न करता मातोश्रीच्या अटी मान्य केल्या आणि त्यांना हवे ते प्रभाग घेऊ दिले," असा आरोप धुरी यांनी केला.
मातोश्रीची धक्कादायक अट
पक्षांतरामागील सर्वात धक्कादायक कारण सांगताना धुरी म्हणाले की, मातोश्रीवरून (उद्धव ठाकरे) स्पष्ट तह झाला होता की संतोष धुरी आणि संदीप देशपांडे हे कुठेही दिसता कामा नयेत – ना उमेदवारीत, ना प्रचारात. "संदीप देशपांडे यांनी मोठ्या मनाने हा अन्याय सहन केला, पण स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून मला हे मान्य नव्हते. उद्धव ठाकरे हे कोत्या मनाचे आहेत, हे यावरून सिद्ध झाले," असे ते म्हणाले. तसेच, "आम्ही हिंदुत्वासाठी अंगावर केसेस घेतल्या.
महाविकास आघाडी सरकारने आम्हाला पळवले, खोटे गुन्हे दाखल केले. आमच्या सहा नगरसेवकांना पळवले, अविनाश जाधवसारख्यांना ठाण्यात त्रास दिला. ही सल अजूनही कायम आहे," अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. या पक्षांतरामुळे ठाकरे युतीतील तणाव वाढण्याची शक्यता आहे आणि निवडणुकीचे चित्र आणखी गुंतागुंतीचे होईल.