महाराष्ट्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त BMC सज्ज

भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणा-या अनुयायांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज. चैत्यभूमी व इतर ठिकाणी नागरी सेवा-सुविधांची सुसज्ज व्यवस्था.

Published by : shweta walge

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणा-या अनुयायांकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान 'राजगृह' यासह आवश्यक त्या विविध ठिकाणी नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. अनुयायांकरिता जलप्रतिबंधक निवासी मंडप, धूळ प्रतिबंधक आच्छादन, निरीक्षण मनोरे, सीसीटीव्ही कॅमेरा, स्वच्छता, आरोग्य तपासणी तसेच औषधोपचार या अनुषंगाने सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबतच चैत्यभूमीतील आदरांजलीचे मोठ्या पडद्यांवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून समाजमाध्यमांद्वारे देखील थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे अनुयायांसाठी देण्यात आलेल्या सेवासुविधांचा प्रत्यक्ष पाहणी करून काल (दिनाक २ डिसेंबर २०२४) सायंकाळी आढावा घेतला.

उपायुक्त (परिमंडळ-२) श्री. प्रशांत सपकाळे, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त श्री. अजितकुमार आंबी यांच्यासह संबंधित अधिकारी या पाहणीवेळी उपस्थित होते.

मुंबईत येणा-या अनुयायांकरिता चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान याठिकाणी आवश्यक नागरी सेवा-सुविधांची पूर्तता करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी दिले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविधस्तरिय कार्यवाही करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने तात्पुरता निवारा, शामियाना, व्ही. आय. पी. कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, शौचालये, स्नानगृहे, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, विद्युत व्यवस्थेसह मोबाइल चार्जिंग सुविधा इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यांसाठी सुमारे आठ हजार अधिकारी कर्मचारी कार्यरत असणार आहेत.

अनुयायांच्या सुविधेकरिता यंदा जलप्रतिबंधक (वॉटरप्रूफ) मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे पायवाटांवर धूळ प्रतिबंधक आच्छादनाची व्यवस्था सुमारे १८ हजार ५०० चौरस मीटर इतक्या क्षेत्रात करण्यात आली आहे. तसेच जलफवारणी आणि स्वच्छतेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपायुक्त (परिमंडळ २) श्री. प्रशांत सपकाळे यांनी दिली.

त्यासोबतच स्वच्छता राखण्यासाठी वाहने आणि कर्मचारी व्यवस्थाही करण्यात आली आहे. शौचालये आणि स्नानगृहांचीही व्यवस्था मैदान परिसरामध्ये करण्यात आली आहे. जवळपास ८ हजार मनुष्यबळ या सर्व सोयी-सुविधांच्या पूर्ततेसाठी कार्यरत असते. त्यासोबतच महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या वैद्यकीय चिकित्सा सुविधेमध्ये ३ कक्ष उभारण्यात येणार आहेत. तसेच ११ रूग्णवाहिकांची उपलब्धताही करून देण्यात आली आहे. मैदान परिसरात अनुयायांच्या सुविधेसाठी आरोग्य तपासणी आणि औषधोपचारासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण वैद्यकीय आणि सहायक वैद्यकीय कर्मचारी मिळून ५८५ मनुष्यबळ यंदा कार्यरत असणार आहे. गतवर्षी एकूण १३ हजार ८२४ अनुयायांनी आरोग्य तपासणी आणि औषधोपचारांचा लाभ घेतला होता, अशी माहिती जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त श्री. अजितकुमार आंबी यांनी दिली.

महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सचित्र माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येते. प्रतिवर्षी या माहिती पुस्तिकेच्या १ लाख प्रतींचे विनामूल्य वितरण चैत्यभूमी येथे करण्यात येते. या वर्षीच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन हे दिनांक ०५ डिसेंबर २०२४ रोजी विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 'भीमा तुम्हा वंदना' या या शीर्षकाखालील माहिती पुस्तिकेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित अभिवादनपर गीते ही यंदाच्या पुस्तिकेची मध्यवर्ती संकल्पना आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित अशा गीतांचा समावेश पुस्तिकेत करण्यात आला आहे.

महानगरपालिकेतर्फे चैत्यभूमी परिसर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर, दादर रेल्वे स्थानक, राजगृह (हिंदू कॉलनी, दादर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) व लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) येथे आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश आहे.

* चैत्यभूमी येथे शामियाना व व्ही. आय. पी. कक्षासह नियंत्रण कक्षाची व्यवस्था. नियंत्रण कक्षाशेजारी, तोरणा प्रवेशद्वाराजवळ व सूर्यवंशी सभागृह मार्गासह विविध ११ ठिकाणी रुग्णवाहिकेसहीत आरोग्यसेवा.

* १ लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपात तात्पुरता निवारा.

* पिण्याच्या पाण्याच्या नळाची व्यवस्था.

* संपूर्ण परिसरात विद्युत व्यवस्था.

* अग्निशमन दलामार्फत आवश्यक ती सेवा.

* चौपाटीवर सुरक्षारक्षकांसहीत बोटींची संपूर्ण परिसरात व्य्वस्था.

* चैत्यीभूमी स्मारकातील आदरांजली कार्यक्रमाचे मोठ्या पडद्यांवर थेट प्रक्षेपण.

* फेसबुक, एक्स (पूर्वीचे ट्विटर), यूट्यूब या समाजमाध्यमांवर असणा-या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत खात्याद्वारे दिनांक ६ डिसेंबर रोजी थेट प्रक्षेपणाची व्यवस्था.

* विचारप्रवर्तक पुस्तकांसह वैविध्यपूर्ण बाबींच्या विक्रीसाठी स्टॉल्सची रचना.

* राजगृह येथे नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्ष.

* स्काऊट गाईड हॉल येथे भिक्खू निवासाची व्यवस्था.

* मैदानात धुळीचा त्रास रोखण्यासाठी पायवाटेवर आच्छादनाची व्यवस्था.

* अनुयायांना मार्गदर्शनाकरीता १०० फूट उंचीवर स्थळ निदर्शक फुग्यांची व्यवस्था.

* मोबाइल चार्जिंगकरीता छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे पॉइंटची व्यवस्था.

* फायबरच्या तात्पुरत्या स्नानगृहाची व तात्पुरत्या शौचालयांची पुरेशा संख्येने व्यवस्था.

* रांगेतील अनुयायांसाठी तात्पु‍रते छत व बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था.

* स्ना‍नगृहे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व अनुयायांना नागरी सेवा-सुविधा देण्यासाठी महानगरपालिका सुसज्ज आहे. अनुयायांनी या सेवा-सुविधांचा लाभ घ्यावा. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलिस दल इत्यादींद्वारे देण्यात येणा-या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे नम्र आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी यानिमित्ताने केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?