(Ajit Pawar)कोकणातून रोजगार, व्यवसाय किंवा शिक्षणाच्या निमित्ताने मुंबई, पुण्यासह इतर शहरांकडे स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांना बराच काळ ‘चाकरमानी’ या नावाने संबोधले जात होते. मात्र हा शब्द कमीपणाचा अर्थ दर्शवतो, अशी भावना कोकणातील अनेक संघटनांनी व्यक्त केली. यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट निर्देश देत यापुढे या नागरिकांना ‘कोकणवासीय’ म्हणून संबोधावे, असा निर्णय घेतला आहे.
मुंबई–गोवा महामार्गासंदर्भात मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत ही बाब चर्चेला आली. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यासह विविध कोकण संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत सहभाग घेतला होता. त्यात शासकीय कागदपत्रांमध्ये ‘चाकरमानी’ हा शब्द वापरण्याबाबत तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला. त्याऐवजी कोकणातील स्थलांतरित नागरिकांचा सन्मान राखण्यासाठी ‘कोकणवासीय’ हा शब्द वापरावा, अशी मागणी करण्यात आली.
‘चाकरमानी’ हा शब्द ‘चाकर’ म्हणजे सेवक आणि ‘मानी’ म्हणजे स्वीकारणारा यावरून बनलेला असल्याने तो अपमानास्पद असल्याचे मत काही संघटनांनी व्यक्त केले होते. शिमगा, गणेशोत्सव, दिवाळी अशा सणांच्या काळात मोठ्या संख्येने गावी परतणाऱ्या नागरिकांना हा शब्द वापरला जात होता. मात्र आता त्यांच्या मेहनतीला योग्य सन्मान मिळावा या हेतूनं शासनाकडून हा बदल करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच यासंदर्भात परिपत्रक जारी होणार आहे.