वाढीव वीज बिलाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाविरणाला अनेकदा आंदोलनाचा शॉक दिला आहे. आज कल्याणमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेत अधिकाऱ्याच्या कार्यालयातील पंखा-बत्ती गुल करुन मेणबत्ती भेट दिली. तसेच आता मेणबत्ती भेट दिली उद्या कार्यालय पेटवून देणार, असा इशाराही मनसेने दिला आहे.
कल्याण-डोंबिवलीत काही नागरीकांचा वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. याची माहिती मिळताच मनसेचे पदाधिकारी योगेश गव्हाणे, महेंद्र कुंदे, अनंता गायकवाड, निर्मल निगडे हे पदाधिकारी कल्याण पूर्व टाटा पॉवर नाका परिसरात असलेल्या वीज वितरण कार्यालयात पोहचले.
यावेळी एखाद्या सामान्य नागरिकांच्या घरातील वीज तोडणी केल्यावर त्याला किती यातना सहन कराव्या लागतात. याची महावितरणचे कार्यकारी अभियंता नरेंद्र धबड यांना जाणीव व्हावी यासाठी कार्यालयातील लाईट, पंखा बंद केला. जवळपास पाऊण तास मनसे पदाधिकारी अधिकाऱ्यांसोबत अंधारात चर्चा करीत होते. नंतर धबड यांना मेणबत्ती भेट दिली.इतकंच नाही तर वीज तोडणीची कारवाई थांबिवली, तर कार्यालय पेटवून देण्याची धमकीही यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
वीज तोडणीची कारवाई महावितरणने थांबविली पाहिजे. आज मेणबत्ती दिली आहे. उद्या मेणबत्ती पेटवून देणार तसेच कार्यालयही पेटवून देणार असा सज्जड दम मनसे पदाधिकारी योगेश गव्हाणे यांनी दिला.