मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेंबूरमधील वॉर्ड क्रमांक १५३ मध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेकडून पैसे वाटप केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. शिंदे गटाचे आमदार तुकाराम काते यांच्या सून तन्वी काते या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांनी हा आरोप केला आहे.
काल दुपारच्या सुमारास चेंबूर खारदेव नगर येथील चाळींमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन पैसे वाटण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या दरम्यान पैसे वाटत असल्याचा आरोप असलेला शिंदे गटाचा पदाधिकारी पप्पू भाटी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पैसे वाटतानाचा व्हिडिओ चाळींमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.
या प्रकरणी ठाकरे गटाच्या उमेदवार मीनाक्षी पाटणकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार दाखल केली असून, प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराकडून पैसे वाटप करण्यात येत आहे आणि प्रचार तर १० ला संपतो पण यांचे उमेदवार लोकांच्या घरी रात्री १ वाजता आणि २ वाजता जात आहेत आणि इतक्या रात्री घरी जाऊन लोकांच्या हे काय करत आहेत?
भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा हे वाटण्याच काम हे लोक करत आहेत. आज दुपारी देखील यांच्या पप्पू भाटी या कार्यकर्त्याला पोलिसांनी पैसे वाटताना पकडलं आहे आणि जे लोक पैसे वाटत होते तेच लोक यांच्या रॅली मधे फिरत होते त्यामुळे या लोकांवर कारवाई ही झाली पाहिजे. आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना पैसे वाटप करून आचारसंहितेचा भंग केला आहे या प्रकरणात तक्रार सुद्धा दिली आहे याबर त्यांनी कारवाई करावी ही आमची विनंती आहे. पैसे वाटणारा हा सीसीटीव्ही फुटेज मधला माणसाला पोलिसांनी पकडलं आहे त्यामुळे यांची उमेदवारी ही रद्द करण्यात यावी ही आमची मागणी आहे.