मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डातील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी आज (रविवारी) विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत नेरळ-खोपोलीदरम्यान उपनगरीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी सकाळी ११.२० ते दुपारी १.०५ दरम्यान मध्य रेल्वेच्या पळसधरी (क्रॉसओव्हर वगळून) आणि कर्जत स्थानकांदरम्यान (क्रॉसओव्हरसह) अप आणि मध्य मार्गिकेवर, कर्जत (क्रॉसओव्हरसह) ते चौक/भिवपुरी स्थानक (क्रॉसओव्हर वगळून) अप आणि डाऊन मार्गिकेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत नेरळ-खोपोलीदरम्यानची लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे.
दुपारी १२ आणि दुपारी १.१५ वाजता कर्जत येथून सुटणारी खोपोली लोकल तसेच सकाळी ११.२० आणि दुपारी १२.४० वाजता खोपोली येथून कर्जत जाणारी लोकल रद्द करण्यात येणार आहे. सीएसएमटी येथून सकाळी ९.२७ ते सकाळी ११.१४ ची सीएसएमटी-कर्जत लोकल नेरळ स्थानकावर थांबविण्यात येतील. तर सकाळी ११.१९ ते दुपारी १ या वेळेत सुटणाऱ्या कर्जत-सीएसएमटी लोकल नेरळपर्यंत चालवण्यात येतील.
मेगाब्लॉकदरम्यान असं राहील वेळापत्रक
बदलापूर आणि खोपोली स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा बंद राहील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस खोपोली आणि दुपारी 1 वाजून 19 मिनिटांनी सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कर्जत उपनगरी गाडी अंबरनाथ येथे शॉर्ट टर्मिनेट होईल. कर्जत येथून दुपारी 1 वाजून 55 मिनिटांनी सुटणारी कर्जत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ट्रेन आणि खोपोली येथून दुपारी 1 वाजून 48 मिनिटांनी सुटणारी खोपोली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ट्रेन अंबरनाथ येथून सुटेल. तसेच, कर्जत येथून दुपारी 3 वाजून 26 मिनिटांनी सुटणारी कर्जत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ट्रेन बदलापूर येथून सुटेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कर्जत उपनगरी गाडी बदलापूर येथे शॉर्ट टर्मिनेट होईल. तर ट्रेन क्रमांक 22194 ग्वाल्हेर दौंड एक्सप्रेस दुपारी 2 वाजून 55 मिनिटे ते 3 वाजून 35 मिनिटांदरम्यान चौक येथे रेग्युलेट करण्यात येईल.