( Latur )राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान लातूरमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. अखिल भारतीय छावा संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद सुरू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी करत पत्ते फेकून निषेध नोंदवला.
छावा संघटनेच्या शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज लातूर शहर बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि राज्याचे कृषिमंत्री कोकाटेंचा तात्काळ राजीनामा घ्यावा, या मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.दरम्यान, अजितदादांनी या कार्यकर्त्यांना आवरावे, अन्यथा छावा संघटना जशास तसं उत्तर देईल, असा इशारा छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी दिली आहे.