भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील मतभेद गेल्या काही दिवसांत वाढले आहेत. अजित पवारांनी ७० हजार कोटींच्या आरोपावर 'आरोप करणाऱ्यांसोबत सत्तेत आहे' असे म्हटले, यावर भाजप नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिल्या.
भाजप नेते आशिष शेलार यांनी 'आम्ही सावरकर भक्त, अजित पवार गटाला सावरकर विचार मान्य करावे लागतील. याल तर सोबत, न याल तर विरोधात काम करू' असा इशारा दिला. राष्ट्रवादी प्रवक्ते सुरज चव्हाण म्हणाले, 'कोणी जबरदस्तीने विचार लादू शकत नाही, भारत संविधानावर चालतो.' आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "वीर सावरकरांच्या विचारांचा अजित दादांनी विरोध करण्याचे कारण नाही. मी असा विरोध पाहिला नाही. पण आमची भूमिका पक्की आहे. सावरकर विरोध आम्हाला मान्य नाही." फडणवीसांनी अजित पवारांना अप्रत्यक्ष आवाहन केले असून, आगामी काळात राष्ट्रवादीची भूमिका काय होईल हे पाहिले जाईल.
अजित पवारांना सावरकर मुद्द्यावर विचारले असता त्यांनी सावध भूमिका घेतली. "तुम्ही विकासाबद्दल विचारा, महायुतीत अंतर वाढवण्याचे प्रश्न विचारता. मला फक्त महानगरपालिका निवडणुकीचे प्रश्न विचारा. मी ज्या महापालिकेत प्रचाराला जाईन, त्यावर बोलीन. इतर प्रश्नांना नो कमेंट. निवडणुका संपल्यावर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईन," असे पवार म्हणाले. या वादाने महायुतीतील तणाव वाढला असून, निवडणुकीनंतर राजकीय समीकरणे बदलू शकतात.