पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आज संपत असून 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. प्रचाराच्या शेवटी भाजपने पुण्यात मोठी सभा घेतली. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले की, ही निवडणूक फक्त नगरसेवक निवडण्यापुरती मर्यादित नाही, तर पुण्याच्या भविष्यासाठी दिशा ठरवणारी आहे. गेल्या काही वर्षांत केंद्राच्या सहकार्याने शहराचा कायापालट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, महापालिका निवडणूक म्हणजे गुंडगिरीला प्रोत्साहन देणारी नसून, शहराला सक्षम नेतृत्व देणारी निवडणूक आहे. पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, रस्ते आणि वाहतूक यासाठी ठोस योजना आखण्यात आल्या आहेत. पुण्यातील अनियंत्रित बांधकामांना आळा घालण्यासाठी निर्णय घेतले असून, नागरिकांवरचा अतिरिक्त करही रद्द करण्यात आला आहे. शिवाजीनगरच्या विकासासाठी राज्य सरकार पूर्णपणे साथ देईल, असा विश्वास त्यांनी दिला.
मुळा-मुठा नदी सुधारणा, वेगवान वाहतूक व्यवस्था, भुयारी रस्ते यामुळे पुण्याची ओळख बदलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच लाडकी बहीण योजना सुरूच राहील आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा संकल्प सरकारचा असल्याचे त्यांनी सांगितले. शहर, राज्य आणि केंद्रात एकाच विचाराचे सरकार हवे, असे सांगत त्यांनी पुणेकरांना भाजपला साथ देण्याचे आवाहन केले.