“ही युती राजकीय भूकंप नाही; अस्तित्व टिकवण्यासाठीची धडपड”
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीनंतर राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर पहिली आणि थेट प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्याने मोठा राजकीय बदल होईल, हा समजच चुकीचा असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. “ते एकत्र आले याचा आनंद असू शकतो. पण यामुळे फार काही राजकीय उलथापालथ होईल, असा समज बाळबोध आहे,” असं म्हणत फडणवीसांनी या युतीचा प्रभाव कमी लेखला. काही माध्यमांनी ही युती जणू आंतरराष्ट्रीय संघर्षासारखी रंगवली, त्यावरही त्यांनी टोला लगावला. “काहीजण हे दृश्य रशिया-युक्रेन युद्धासारखं दाखवत आहेत, जणू झेलेन्स्की आणि पुतीन एकत्र येत आहेत,” अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली.
“अस्तित्वासाठी लढणाऱ्यांची युती”
फडणवीसांनी ठाकरे बंधूंच्या युतीमागचं कारण स्पष्ट करताना म्हटलं की, “निवडणुकीत आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी जे करावं लागतं, त्या दृष्टीने दोन पक्षांनी ही युती केली आहे. यापलीकडे त्यातून फार अर्थ काढण्याचं कारण नाही.” मुंबईकरांचा विश्वास या पक्षांनी वारंवार दगा दिला असल्याचा आरोप करत त्यांनी ठाकरे गट आणि मनसेवर जोरदार हल्ला चढवला. “मुंबईकरांचा विश्वासघात, मराठी माणसाला मुंबईबाहेर घालवण्याचं पाप आणि अ-मराठी समाजावर केलेले सातत्यपूर्ण हल्ले या सगळ्यामुळे मुंबईत कोणीही त्यांच्या सोबत उभं राहणार नाही,” असं फडणवीस म्हणाले.
“ट्रॅक रेकॉर्ड फक्त भ्रष्टाचाराचा”
ठाकरे गट आणि मनसेचा राजकीय इतिहास लक्ष्य करत फडणवीस म्हणाले, “यांचा ट्रॅक रेकॉर्ड केवळ भ्रष्टाचाराचा आणि स्वहिताचा आहे. निवडणुका आल्या की भावनिक भाषणं केली जातात. पण आता जनता भावनिक बोलण्याला भुलणारी नाही.”
मुंबईकर महायुतीसोबतच
फडणवीसांनी ठामपणे सांगितलं की, मुंबईकरांचा कौल महायुतीच्या बाजूनेच राहील. “महायुतीने केलेला विकास, भविष्यातील मुंबई घडवण्यासाठी सुरू असलेली कामं आणि विशेषतः मराठी माणसाला मुंबईतच घर देण्याचा कार्यक्रम यामुळे मुंबईकर निश्चितपणे महायुतीच्या पाठीशी उभे राहतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आकड्यांवर बोलण्यास नकार
ठाकरे बंधूंच्या युतीकडून मांडल्या जाणाऱ्या विजयाच्या आकड्यांवर प्रतिक्रिया देण्यास फडणवीसांनी स्पष्ट नकार दिला. “आकड्यांशी माझा काही संबंध नाही. त्यांच्या मनात कोणते आकडे आहेत, ते कुठे लावतायत यामध्ये मला रस नाही,” असं त्यांनी सांगितलं. ठाकरे बंधूंच्या युतीभोवती निर्माण करण्यात आलेल्या ‘हायप’वर शेवटी टोला लगावत फडणवीस म्हणाले, “पत्रकार परिषदेमागे जो गाजावाजा तयार केला होता, तो पाहूनच सगळं स्पष्ट होतं.” एकूणच, ठाकरे बंधूंच्या युतीला मोठं आव्हान मानण्यास फडणवीसांनी स्पष्ट नकार देत, मुंबईतील राजकीय सामना महायुतीच जिंकेल, असा ठाम दावा केला आहे.