थोडक्यात
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
पीक पाहणीला महिनाभराची मुदतवाढ
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनंतर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी
(Crop Inspection) राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. खरीप हंगाम 2025 मधील पीक पाहणीची मुदत 30 सप्टेंबर रोजी संपत होती. मात्र, महसूल विभागाने ती मुदत 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत वाढवली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनंतर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत.
गेल्या काही आठवड्यांत अतिवृष्टी, पूर आणि दुबार पेरणीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याआधीही पाहणीसाठीचा कालावधी दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला होता, तरीदेखील अनेक गावांतील शेतांची पाहणी अपूर्ण राहिली होती. आता या नव्या मुदतवाढीमुळे सर्व उर्वरित शेतांची नोंदणी केली जाणार आहे.
महसूल विभागाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, सहायक अधिकारी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करतील आणि ग्राम महसूल अधिकारी त्याची शंभर टक्के पडताळणी करतील. पाहणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच त्याची नोंद 7/12 उताऱ्यावर केली जाईल. त्यामुळे एकाही शेतकऱ्याचे नुकसान दुर्लक्षित होऊ नये, याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.
बहुतांश वेळा शेतकरी शेतात किंवा गावाबाहेर नसल्याने पाहणी अपूर्ण राहते. या अतिरिक्त महिन्यात सर्व शेतांचे मूल्यांकन पूर्ण करून अहवाल सादर केल्यास नुकसानभरपाईची प्रक्रिया अधिक गतीने सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.