(Damini App ) पावसाळ्यात वीज कोसळून होणाऱ्या जीवितहानीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. मागील दहा वर्षांतील आकडेवारी पाहता, विजेच्या धक्क्यांमुळे अनेक बळी गेले आहेत. यावर उपाय म्हणून भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या वतीने ‘दामिनी अॅप’ तयार करण्यात आले असून 21 ते 30 मिनिटे आधी पूर्वसूचना मिळू शकणार आहे.
या अॅपच्या मदतीने 300 किलोमीटरच्या परिसरात वीज कोसळण्याची शक्यता असल्यास नागरिकांना सतर्कतेचा इशारा मिळतो. अॅपमध्ये वापरकर्त्याच्या GPS लोकेशनच्या आधारे अचूक माहिती देण्यात येते. विशेष म्हणजे वीज कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणाची माहिती 14 मिनिटे आणि उच्चजोखमीच्या ठिकाणी 7 मिनिटे आधी मिळते, त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी वेळ मिळतो आणि संभाव्य जीवितहानी टाळता येते.
दामिनी अॅपची वैशिष्ट्ये:
300 किमीच्या परिसरात वीज पडण्याची शक्यता असल्यास पूर्वसूचना
GPS आधारित अचूक माहिती
सुरक्षिततेसाठी आवश्यक सूचना
वीज कोसळल्यास करण्याचे प्राथमिक उपचार
हिंदी, मराठीसह विविध स्थानिक भाषांमध्ये अॅप उपलब्ध
या अॅपमध्ये वीज कोसळताना झाडाखाली थांबू नये, उंच जागी किंवा दगडाखाली उभं राहू नये, धातूच्या वस्तूंना स्पर्श करू नये, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. शिवाय, वीज पडलेल्या व्यक्तीवर कोणते प्राथमिक उपचार करावेत, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले आहे.
राज्य शासनाने महसूल विभागातील सर्व अधिकाऱ्यांना, तसेच तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, पोलिस पाटील, सरपंच, कोतवाल, डाटा एंट्री ऑपरेटर यांना हे अॅप डाऊनलोड करून वापरण्याचे निर्देश दिले आहेत. तालुकास्तरावरील सर्व यंत्रणांनी या अॅपचा लाभ घेऊन नागरिकांना सुरक्षिततेबाबत माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.