महाराष्ट्र

पंचनामे पूर्ण होताच तात्काळ शेतकर्‍यांना आर्थिक मदत : फडणवीस

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमरावती : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाकडून गारपीट आणि अतिवृष्टीमुळे अमरावती विभागातील झालेल्या पीकनुकसानीचा आढावा घेतला. पंचनामे पूर्ण होताच तात्काळ शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या बैठकांनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 3245 हेक्टरचे पंचनामे पूर्ण झाले असून आणखी 4 हजार हेक्टरचे पंचनामे लवकरच पूर्ण होतील. त्यानंतर या शेतकर्‍यांना तात्काळ शासनातर्फे मदत दिली जाईल. सातत्याने शेतकर्‍यांची तक्रार होती की, केवळ 65 मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला तरच मदत मिळते. त्यामुळे ‘सततचा पाऊस’ हा नवा निकष तयार करण्यात आला आणि त्याची सुद्धा नुकसानभरपाई देण्याचा निर्णय गेल्याच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अमरावती विभागात तीन वेळा अशी आपत्ती आली आहे. त्यांना निश्चितपणे मदत मिळेल. गारपीटग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या पाठिशी राज्य सरकार ठामपणे उभे राहील.

अकोला जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेडवर झाड पडून घडलेल्या घटनेत 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 35 जखमी झाले. मृतांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यासंबंधीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. जखमींवर उपचारांचा खर्च करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, आज अमरावतीतील दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पाबाबत बैठकी घेण्यात आल्या. पीएम मित्राअंतर्गत अमरावतीला मेगा टेक्स्टाईल पार्क मंजूर झाला आहे. यासाठी 220 हेक्टर जागेचे भूसंपादन झालेले आहे. पुढच्या 15 दिवसांत उर्वरित संपूर्ण भूसंपादन पूर्ण होईल. जे भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारसोबत सामंजस्य करार करुन पायाभूत सुविधा निर्मितीची प्रक्रिया सुरू होईल. रेमंडसारख्या उद्योजकांशी गेल्याच आठवड्यात आपली चर्चा झाली असून किमान 15 विविध कंपन्यांशी राज्य सरकार संपर्कात आहे.

कापसापासून कापडापर्यंत आणि कापडापासून गारमेंटपर्यंत अशी ही इकोसिस्टीम तयार करण्यात येत आहे. पश्चिम विदर्भात मोठा विकास यातून होईल, कापूस उत्पादकांना लाभ होईल आणि तरुणांना मोठा रोजगार उपलब्ध होईल. जिनिंग-प्रेसिंगपासून सर्व संलग्न उद्योग या टेक्स्टाईल पार्कमध्ये असतील, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...

India Alliance Meeting : बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तिप्रदर्शन, मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार सभा

Anil Deshmukh : तटकरे साहेब हॉटेलमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना भेटले; आमच्या संपर्कात जरी ते आले तरी आम्ही त्यांना घेणार नाही

Kejriwal Meet Thackeray : इंडिया आघाडीच्या सभेआधी केजरीवाल घेणार ठाकरेंची भेट

पुन्हा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील चित्रपटाची टीम राज्यभर दौऱ्यावर