(Vadhavan Port) वाढवण बंदराचे विकसित रूप हे जेएनपीटीच्या तुलनेत तीनपट मोठे असणार असून, हे बंदर लवकरच जगातील आघाडीच्या दहा प्रमुख बंदरांमध्ये गणले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. हे बंदर पुढील वीस वर्षांत महाराष्ट्रासाठी नवे आर्थिक युग निर्माण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुंबई एकटीच 1.5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था निर्माण करण्याची क्षमता बाळगते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2013-14च्या बॅचमधील भारतीय विदेश सेवेतील 14 अधिकाऱ्यांशी सह्याद्री अतिथीगृह येथे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, तसेच राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव सीमा व्यास उपस्थित होते.
या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी बंदर, रस्ते व शैक्षणिक प्रकल्पांची आवश्यकता आहे. कोस्टल रोड प्रकल्प सुरु असून, अटल सेतूमुळे ‘तिसरी मुंबई’ आकार घेत आहे. याशिवाय, 200एकरमध्ये ‘एज्यूसिटी’ उभारण्यात येणार असून, देशातील 12 विद्यापीठे व सुमारे 1 लाख विद्यार्थी येथे शिकतील. 300 एकर क्षेत्रात ‘इनोव्हेशन सिटी’ तर 1000 एकरमध्ये ‘नॉलेज सिटी’ साकारली जाईल.
या संवादात महाराष्ट्रातील परराष्ट्र धोरणातील सहभाग, आंतरराष्ट्रीय गुंतवणूक संधी, आणि जागतिक पातळीवरील प्रकल्पांबाबत सखोल चर्चा झाली. येत्या पाच वर्षांत मुंबईचे स्वरूप पूर्णपणे बदलेले असेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.