थोडक्यात
राज्यात मुसळधार पाऊस सुरु
मुसळधार पावसामुळे DMER च्या परीक्षा पुढे ढकलली
स्थगित केलेल्या परीक्षांच्या नवीन तारखा लवकरच घोषित केल्या जाणार
( DMER Exam ) राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम शैक्षणिक क्षेत्रावरही झाला आहे. डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (DMER) तर्फे होणाऱ्या विविध भरती व शैक्षणिक परीक्षा तात्पुरत्या स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
गेल्या काही दिवसांत मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक भागांत रस्ते बंद झाल्याने विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यात अडचणीत आले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
DMER च्या निवेदनात सांगण्यात आले आहे की, स्थगित केलेल्या परीक्षांच्या नवीन तारखा लवकरच घोषित केल्या जातील. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट व सूचना नियमित तपासण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. प्रशासनाने स्पष्ट केले की, पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वात मोठे प्राधान्य दिले जात आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शक्य तितक्या लवकर नवीन वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी केली आहे. काहींना या निर्णयामुळे दिलासा मिळाला असला तरी, मोठ्या संख्येने विद्यार्थी आता पुढील तारखांची प्रतीक्षा करत आहेत.