(Mahaparinirvan Diwas) आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 69 व्या महापरिनिर्वाण दिवस आहे. यानिमित्ताने मुंबईतल्या दादरच्या शिवाजी पार्क परिसरात अनुयायांची गर्दी वाढू लागली आहे. त्यांच्या व्यवस्थेसाठी प्रशासकीय यंत्रणाही सज्ज आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं आंबेडकरांचे अनुयायी दाखल होत असतात.
याच पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा महापरिनिर्वाण दिन सुरक्षितपणे व निर्विघ्नपणे पार पाडण्याकरीता मुंबई पोलीस सज्ज असल्याचे पाहायला मिळत आहे. चोख पोलीस बंदोबस्ताचे आयोजन करण्यात आलेले असून मुंबई पोलीस दलाकडून 3 अपर पोलीस आयुक्त, ८ पोलीस उप आयुक्त, 21 सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह 492 पोलीस अधिकारी व 4640 पोलीस अंमलदार असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेले आहेत.
शिवाजी पार्क येथे लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने जय्यत तयारी केली असून महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अनुयायांसाठी औषधोपचार आणि वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी 20 रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. निवारा, स्वच्छता, वैद्यकीय सेवा आणि सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे.