थोडक्यात
राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सरकारने नवा निर्णय घेतला आहे
सर्व लाभार्थी महिलांनी आता ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणं बंधनकारक
या प्रक्रियेसाठी शासनाने वेब पोर्टल उपलब्ध करून दिलं
(Ladki Bahin Yojana) राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सरकारने नवा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ सतत आणि पारदर्शक पद्धतीने मिळावा यासाठी सर्व लाभार्थी महिलांनी आता ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणं बंधनकारक केलं आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.
या प्रक्रियेसाठी शासनाने वेब पोर्टल उपलब्ध करून दिलं असून, लाभार्थींनी दिलेल्या कालावधीत ऑनलाईन पडताळणी पूर्ण करणं आवश्यक आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार ही पद्धत अगदी सोपी व सहज आहे, त्यामुळे कोणालाही अडचण येणार नाही.
मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील २ महिन्यांच्या आत सदर e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती.
"ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे." असे आदिती तटकरे म्हणाल्या.