Akola muncipal Corporation  Team Lokshahi
महाराष्ट्र

अकोला महापालिकेत शिक्षणाधिकारीच नाहीत;शिक्षण विभाग वाऱ्यावर

विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधांकडे लक्ष देणार कोण? अधिकाऱ्यांची पदेही रिक्त

Published by : Sagar Pradhan

अमोल नांदूरकर|अकोला : शहरातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेत शिक्षणाधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. अधिकारीच नसल्याने या पदाचा प्रभार कोणत्या अधिकाऱ्याकडे सोपवावा? असा प्रश्न निर्माण झाला असून या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधांकडे लक्ष देणार कोण? अशी चर्चाही या निमित्ताने सुरु आहे.

महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था आहे. महापालिका क्षेत्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे. महापालिकेच्या वतीने हिंदी, मराठी,उर्दु, गुजराती अशा चार माध्यमातून शिक्षण दिले जाते. एकेकाळी हजारो विद्यार्थी संख्या असलेल्या महापालिकेच्या शाळांमध्ये आता ही संख्या सहा हजारावर आली आहे. तर ३३ शाळांमधुन हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महापालिका अस्तित्वात आल्यापासून २२ वर्षाच्या काळात पहिले आयुक्त लक्ष्मीकांत देशमुख वगळता अन्य आयुक्तांनी शिक्षण विभागाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे बोटावर मोजण्या इतक्या शाळा वगळता अन्य शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावला आहे.

महापालिकेत शिक्षणाधिकारी म्हणून डॉ.शाहिन सुलनाता यांची २००६-२००७ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. मात्र शाहिन सुलताना यांच्या नियुक्तीबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या प्रकरणाची फाईल अनेक आयुक्तांनी पेडिंग ठेवली. मात्र आयुक्त कविता द्विवेदी यांनी या फाईलचा निपटारा केला. शिक्षणाधिकारी शाहिन सुलताना यांना शिक्षकाच्या मुळपदावर नियुक्त करण्यात आले. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्याचे पद रिक्त होते.

या पदाचा प्रभार कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या उपायुक्त अनिल अडागळे यांच्याकडे सोपविण्यात आला. मात्र सेवा निवृत्त प्रशासकीय अधिकारी असलेल्या अनिल अडागळे यांना आपल्या कामाची छाप पाडता आली नाही. त्यामुळे शिक्षण विभागाचे कामकाज कोलमडले. दरम्यान अनिल अडागळे यांनी राजीनामा दिल्या नंतर ही जबाबदारी सहाय्यक आयुक्त पुनम कळंबे यांच्याकडे देण्यात आली. त्या दिर्घ रजेवर गेल्या नंतर ही जबाबदारी उपायुक्त जुम्मा प्यारेवाले यांच्याकडे सोपविण्यात आली. तर तेही दिर्घ रजेवर गेले. त्यामुळे तुर्तास महापालिकेला शिक्षणाधिकारीच नसल्याने शिक्षण विभागाचे कामकाज कोलमडले आहे.

प्रभार देणार कुणाला?

तुर्तास सहाय्यक आयुक्तांची तीन पदे, उपायुक्तांची दोन पदे तसेच शिक्षणाधिकारी, प्रशासकीय अधिकारी ही पदे रिक्त आहेत. तर एक सहाय्यक आयुक्त दिर्घरजेवर गेल्या आहेत. तर उपायुक्त देखिल दिर्घ रजेवर गेले आहेत. अन्य वरिष्ठ अधिकारीच महापालिकेत नसल्याने कामाचा गाडा हा एकट्या आयुक्त कविता द्विवेदी यांच्या खांद्यावर आला आहे. त्यामुळेच शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार नेमका कोणाला द्यावा? असा प्रश्न प्रशासनासमोर उपस्थित झाला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा