मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येताच राज्याच्या राजकारणात आरोप–प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर जोरदार शब्दांत टीका करत, ही युती विकासासाठी नव्हे तर सत्तेसाठी आणि अस्तित्व टिकवण्यासाठी असल्याचा आरोप केला आहे. “काही युती जनतेच्या विकासासाठी होतात. महायुती ही महाराष्ट्र आणि मुंबईच्या विकासासाठी आहे. पण आत्ताची युती ही फक्त सत्तेसाठी झाली आहे. निवडणुका जवळ आल्या की यांना मराठी माणूस आठवतो,” असा थेट टोला शिंदे यांनी लगावला.
“महायुती मजबुतीने उभी आहे”
कोण कुणाशीही युती करो, त्याचा महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही, असा दावा शिंदे यांनी केला. “लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीने विजय मिळवला आहे. त्यामुळे सत्तेसाठी झालेल्या युत्यांमुळे आम्हाला काही फरक पडत नाही,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
“पालिकेकडे सोन्याची कोंबडी म्हणून पाहिलं”
ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका करताना एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला. “मुंबई महापालिकेकडे या मंडळींनी सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिलं. आता ती कोंबडीच कापून खाण्याचं काम सुरू आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर, “ही युती स्वार्थासाठी आणि अस्तित्व टिकवण्यासाठी आहे. पण जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. युती झाली तरी विठ्ठल आमच्याकडेच आहे,” असं म्हणत शिंदे यांनी आत्मविश्वास व्यक्त केला.
“विकासाचा अजेंडा कुठे?”
राज–उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेकडे बोट दाखवत शिंदे म्हणाले, “त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मुंबईच्या विकासावर एकही शब्द नव्हता. अजेंडा फक्त सत्तेचा आहे. बाळासाहेबांचा विचार ज्यांनी सोडला, त्यांना जनतेने आधीच त्यांची जागा दाखवली आहे. असली आणि नकली काय, हे महापालिका निवडणुकीत स्पष्ट होईल.”
“मराठी माणूस मुंबईबाहेर गेला”
एकनाथ शिंदे यांनी आरोप केला की, ठाकरे यांच्या काळात मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला. “या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आम्ही करतोय. पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावत आहोत. रमाबाई आंबेडकर नगरमधील 17 हजार घरांचं काम आम्ही सुरू केलं आहे. त्यांनी मुंबईसाठी नेमकं काय केलं, हे त्यांनी सांगावं,” असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला.
“मुंबईकरांना भावनिक मुद्दे नकोत”
निवडणुका आल्या की ‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार’ असे फलक लावले जातात, अशी टीका करत शिंदे म्हणाले, “मुंबईकर सुज्ञ आहेत. त्यांना भावनिक घोषणा नकोत, विकास हवा आहे. आम्ही घेतलेले निर्णय मुंबईकरांच्या हिताचे आहेत.” पुढील सहा महिन्यांत मुंबई खड्डेमुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कोरोना काळातील कारभारावरूनही शिंदे यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले.
“कोरोनाच्या काळात यांनी फक्त पैसा खाल्ला,” असं म्हणत त्यांनी थेट सवाल उपस्थित केला, “जे आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, ते राज्य आणि मुंबई काय सांभाळणार?” “जनता उत्तर देईल” शेवटी शिंदे यांनी पुन्हा एकदा ठाम शब्दांत सांगितलं की, ठाकरे बंधूंची युती कितीही गाजवली गेली, तरी ती जनतेला मान्य होणार नाही. “ही युती स्वार्थासाठी आहे. जनता योग्य वेळी त्यांना त्यांची जागा दाखवेल,” असा इशारा देत एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.