वाढत्या महागाईच्या काळात एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. मागील काही दिवसांपासून वीज बिलाचा मुद्दा चर्चेत असतानाच हा निर्णय घेण्यात आला असून, वीज दरात जवळपास २ टक्के कपात करण्याचे आदेश आयोगाने वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना दिले आहेत. ही दर कपात १ एप्रिलपासून लागू केली जाणार आहे. वाढत्या इंधन व गॅस दराने हैराण असलेल्या सर्वसामान्यांना वीज नियामक आयोगानं मोठा दिलासा दिला आहे.
वीज नियामक आयोगानं इंधन समायोजन कर फंडाचा वापर करून ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश वीज कंपन्यांना दिले आहेत. आयोगाच्या आदेशानुसार महावितरण, बेस्ट, टाटा, अदाणी या वीज कंपन्यांच्या वीज दरात सरासरी २ टक्क्यांची केली जाणार आहे.
राज्य वीज नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी राज्यातील वीज ग्राहकांचे वीजदरही निश्चित केले आहेत. त्यामुळे युनिटमागे ग्राहकांना ७.५८रुपये द्यावे लागणार आहे. अदाणी कंपनीची वीज घेणाऱ्या ग्राहकांना ०.३टक्के वाढ लागू केली असून, प्रत्येक युनिटसाठी ग्राहकांना ६.५३ रुपये मोजावे लागणार आहे. तर बेस्टच्या ग्राहकांना ०.१ टक्के वाढीनुसार युनिटमागे ६.४२रुपये द्यावे लागणार आहे. टाटा पॉवरच्या वीजदरात १ एप्रिलपासून ४.३ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. आयोगाने दरवाढीला मंजुरी दिली असून, 'टाटा'च्या ग्राहकांना प्रति युनिट ५.२२ रुपयांची अधिकची झळ बसणार आहे.
या संदर्भात फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच १ एप्रिलपासून नागरिकांना मिळणार स्वस्त वीज असल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला आहे. सत्ताधाऱ्यांनी २ टक्के वीज दर कपातीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.