दोन दशकांहून अधिक काळ सातत्याने आयोजित होणारी टाटा मुंबई मॅरेथॉन यंदा आपल्या २१व्या वर्षात प्रवेश करत आहे. जागतिक स्तरावर मान्यता मिळालेली ही स्पर्धा १८ जानेवारी रोजी होणार असून, यंदा पुरुष व महिला गटात अत्यंत दर्जेदार धावपटूंचा सहभाग आहे.
यंदाच्या शर्यतीत सहभागी होणाऱ्या आठ पुरुष आणि सहा महिला धावपटूंच्या वैयक्तिक सर्वोत्तम वेळा या सध्याच्या स्पर्धा विक्रमांपेक्षा जलद आहेत. त्यामुळे यंदा नवे विक्रम प्रस्थापित होण्याची दाट शक्यता आहे. पुरुष व महिला गटातील विद्यमान स्पर्धा विक्रम इथिओपियाच्या हायले लेमी बेरहानू आणि अँकिआलेम हायमॅनॉट यांच्या नावावर आहेत. टाटा मुंबई मॅरेथॉन ही वर्ल्ड अॅथलेटिक्स गोल्ड लेबल रोड रेस आहे. दोन्ही गटांतील पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे ५०,०००, २५,००० आणि १५,००० अमेरिकी डॉलर्सची बक्षिसे दिली जाणार असून, स्पर्धा विक्रम मोडणाऱ्या धावपटूंना अतिरिक्त १५,००० अमेरिकी डॉलर्सचे पारितोषिक मिळणार आहे.
पुरुष गटात एरिट्रियाचा मेरहावी केसेते हा प्रमुख दावेदार असून, युगांडाचा विश्वविजेता व्हिक्टर किपलांगाट, दक्षिण आफ्रिकेचा स्टीफन मोकाका आणि इथिओपियाचे बाजेझेव अस्मारे व ताडू अबाते डेमे हेही अव्वल स्थानासाठी स्पर्धेत उतरले आहेत.
महिला गटात गेल्या वर्षी तिसरे स्थान मिळवणारी मीडिना डेमे आर्मिनो यंदा चांगली कामगिरी करण्याच्या तयारीत आहे. तिच्यासह झिनाह सेनबेटा, येशी चेकोले आणि श्युरे डेमिसे यांसारख्या वेगवान धावपटू महिला गटातील स्पर्धा अधिक चुरशीची बनवतील.
“यंदा टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंचा दर्जा पाहता ही स्पर्धा जागतिक पातळीवर अधिक भक्कम होत असल्याचे दिसते,” असे प्रोकेम इंटरनॅशनलचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक विवेक सिंग यांनी सांगितले.