(Ahilyanagar) अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे सोमवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत चार जणांचा मृत्यू झाला. स्थानिक व्यापारी मयूर रासने यांच्या कालिका फर्निचर दुकानात अचानक आग लागली. दुर्दैवाने दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबाला बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.
या दुर्घटनेत मयूर अरुण रासने (45), पत्नी पायल (38), मुलगा अंश (10) आणि धाकटा मुलगा चैतन्य (7) यांचा जागीच मृत्यू झाला. अचानक उसळलेल्या आगीच्या ज्वाळा आणि दाट धुरामुळे बचावकार्य कठीण झाले. परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले, मात्र आगीचा फैलाव इतका झपाट्याने झाला की कुटुंबाला वाचवणे शक्य झाले नाही.
दरम्यान, यश किरण रासने (25) आणि एक ज्येष्ठ महिला (70) गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी प्राथमिक तपासात विद्युत शॉर्टसर्किटची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेने नेवासा परिसरात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.