थोडक्यात
भगवानगडाला वनविभागाची चार हेक्टर जागा देणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली घोषणा
अखेर केंद्रीय पर्यावरण व वन विभागाने अधिसूचना जाहीर करून मंजुरी दिली
( Devendra Fadnavis ) मराठवाड्यासह राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र भगवानगडाच्या विकासाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली आहे. खरवंडी येथील वनविभागाची चार हेक्टर जागा संस्थानला देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा विजयादशमीच्या पूर्वसंध्येला केली.
महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी भक्तगणांच्या सेवासुविधा, रुग्णालय, प्रशिक्षण केंद्र आणि सामाजिक कार्यासाठी जागेची मागणी केली होती. या संदर्भात राज्य सरकार आणि केंद्र सरकारदरम्यान सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर केंद्रीय पर्यावरण व वन विभागाने अधिसूचना जाहीर करून मंजुरी दिली. फडणवीस यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे आभार मानले.
भगवानगड हा वारकरी संप्रदायातील ऐतिहासिक गड असून, राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. बीड-अहमदनगर सीमेवरील खरवंडी गावाजवळ डोंगरावर वसलेले हे तीर्थक्षेत्र निसर्गरम्य वातावरणामुळे ओळखले जाते. येथे विठ्ठल व पांडवांचे पुरोहित धौम्य ऋषींचे मंदिर असून, संत जनार्दनस्वामी, भगवानबाबा आणि भीमसिंह महाराज यांच्या समाध्या आहेत.
भगवानबाबांनी उभारलेला हा गड सर्वधर्मसमभाव व भक्तीचे प्रतीक म्हणून मानला जातो. भगवानबाबांच्या निधनानंतर संत भीमसिंह महाराजांना गादीवर बसविण्यात आले, तर सध्या संत डॉ. नामदेव महाराज शास्त्री गादीवर विराजमान आहेत.
महाराष्ट्रातील ऊसतोड मजुरांसाठी भगवानगड हे श्रद्धास्थान असून, येथे वर्षभर भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे केंद्राचा घेतलेला हा निर्णय गडाच्या सामाजिक व धार्मिक उपक्रमांना नवे बळ देणारा ठरणार आहे.