आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सर्व पक्षांकडून निवडणूक प्रचार जोरदार सुरु आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रचारसभेसाठी नृत्यांगना गौतमी पाटील हिला बोलवण्यात आलं होतं. त्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चांगलीच टीका केली होती. मुनगंटीवार यांच्या टीकेला विजय वडेट्टीवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
गौतमी पाटील या कलाकार आहेत. त्यांना प्रचारासाठी आणलं तर यात वावगं काय? गौतमी काँग्रेसच्या विचारांनी प्रचाराला येते, त्यामुळे अशा गोष्टींमध्ये काही तथ्य नाही. सुधीर मुनगंटीवार यांना एकच सांगणं आहे, चंद्रपूर जिल्ह्यात 12 पैकी 8 नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आली. आता तुमची चंद्रपूरमध्ये भाजप वाचते की नाही हे तुम्ही बघा, अशा शब्दात वडेट्टीवारांनी चांगलाच पलटवार केला आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे यांनाही वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
आमचा लाडकी बहीण योजनेला विरोध नाही. मात्र निवडणुका जिंकण्यासाठी लाडक्या बहिणींचा वापर भाजपकडून होत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे. तर निवडणूक आयोगावर ही वडेट्टीवार यांनी निशाणा साधला. यांनी 50 टक्क्यांवर आरक्षण देऊन निवडणुका कशा घेतल्या राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाचे डोके ठिकाणावर आहे का असा सवालही वडेट्टीवार यांनी विचारला आहे. तर असुदुद्दीन ओवेसी हे भाजपचा भाट असल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली.