(Government Employee) राज्य सरकारने सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियावर वापरासंबंधी नवे मार्गदर्शक निर्देश जारी केले आहेत. या अंतर्गत सोशल मीडियावर वापर करताना आता काही गोष्टींवर बंधनं घालण्यात आली आहेत, ज्याचे पालन करणे सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना बंधनकारक असेल.
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सरकारी अधिकारी आणि कर्मचारी कोणत्याही धोरणावर, योजनेवर किंवा निर्णयावर सोशल मीडियावर टीका करू शकणार नाहीत. वैयक्तिक सोशल मीडिया अकाऊंटवर केवळ प्रोफाइल फोटो वगळता आपल्या सरकारी पदनामाचा, अधिकृत बोधचिन्ह, पोलीस गणवेश, शासकीय इमारती किंवा वाहनांचे फोटो पोस्ट करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
हे नियम नियमित सरकारी कर्मचाऱ्यांसह करार तत्त्वावर नियुक्त कर्मचारी, बाह्य स्रोतांमधून नेमण्यात आलेले कर्मचारी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे आणि सार्वजनिक क्षेत्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना देखील लागू होणार आहेत.
सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की, या नियमांचं उल्लंघन झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. तसेच, आक्षेपार्ह, द्वेषमूलक किंवा मानहानीकारक मजकूर फॉरवर्ड करण्यास देखील बंदी आहे.
महत्त्वाचे नियम पुढीलप्रमाणे :
शासकीय व वैयक्तिक सोशल मीडिया खाती वेगळी ठेवावी लागणार.
योजनांचा प्रचार अधिकृत खात्यांवरूनच करावा लागणार.
केंद्र व राज्य सरकारने बंदी घातलेल्या अॅप्स/वेबसाइट्सचा वापर करू नये.
गोपनीय कागदपत्रे किंवा माहिती सोशल मीडियावर शेअर करता येणार नाही.
स्वतःच्या कामाची माहिती देता येईल, मात्र स्वतःचं कौतुक/प्रशंसा टाळावी लागेल.
बदली झाल्यास अधिकृत खाते योग्य व्यक्तीकडे हस्तांतरित करावे लागेल.