(AC Temperature ) भारत सरकारने नवीन एअर कंडिशनर्ससाठी (घर, कार्यालय आणि गाड्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्यांसाठी) किमान 20 अंश सेल्सिअस आणि कमाल 28 अंश सेल्सिअस तापमान निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी ही माहिती दिली. उर्जेचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून, या मर्यादा सर्व नवीन एसी युनिट्ससाठी लागू असणार आहेत.
ऊर्जा सचिव पंकज अग्रवाल यांनी सांगितले की, देशात सध्या 10 कोटी एसी असून, दरवर्षी 1.5 कोटी नवीन एसी विकले जातात. एसीचे तापमान एका अंशाने कमी केल्यास ऊर्जा वापरात 6% वाढ होते. त्यामुळे तापमानाच्या मर्यादा निश्चित करणे आवश्यक आहे.
याशिवाय, खट्टर यांनी बॅटरी ऊर्जा संचय प्रकल्पांसाठी 5,400कोटी रुपयांची व्हायबिलिटी गॅप फंडिंग (VGF) जाहीर केली. ही योजना 30 GWh क्षमतेसाठी असून, यामुळे अंदाजे 33,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होईल. हे धोरण 2028 पर्यंत देशातील बॅटरी स्टोरेज गरज भागवण्यास मदत करेल. असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता तुमच्या घरातील किंवा गाडीतील एसीचं तापमान किती असावं हे सरकार ठरवणार असून एसीचे तापमान हे 20 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी किंवा 28 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त सेट करू शकणार नाही. सगळ्या एसी कंपन्यांसाठी हा एकच नियम लागू करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.