नव्या महामार्गांच्या प्रकल्पामुळे नाशिकची कनेक्टीव्हिटी संपूर्ण देशात वाढणार आहे. सूरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर ते चेन्नई पर्यंतच्या ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे प्रकल्पाला भारतमाला परियोजना फेज-1अंतर्गत केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
तसेच नाशिक ते मुंबई महामार्गाच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी पाच हजार कोटी रुपयांच्या मंजुरीसह, पिंपरीसदो ते गोंदे या 20 किमी मार्गाचे सहा पदरीकरण, व नाशिकरोड ते द्वारका ईलिव्हेटेड कॉरिडॉर करणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
याविषयी सांगताना केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, "सूरत ते चेन्नई पर्यंतच्या ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे प्रकल्पाला केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भारतमाला परियोजना फेज-1 अंतर्गत मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामुळे सुरत ते सोलापुर मधील एकूण 515 कि.मी. लांबीपैकी सुमारे 122 किलोमीटर लांबी नाशिक जिल्ह्यातून जात आहे."
द्रुतगती मार्गाने नाशिक ते सुरत अंतर निव्वळ दिड तासात पार करता येईल. हा प्रकल्प 3 वर्षाच्या कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित आसून, या प्रकल्पामुळे इंधन बचतही होणार आहे. प्रवसाचा कालावधी तर कमी होईलंच, त्याच सोबत एक्सप्रसवे ग्रामीण भागातुन जात असल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
"या प्रकल्पामुळे मुंबई, पुणे, सोलापुर इ. मुख्य शहरामधील वाहतुकीवर येणार ताण व त्यामुळे होणारे अपघात, प्रदुषण यांना पायबंद बसणार आहे. नाशिक परिसरातील भाजीपाला ई. नाशिवंत शेतीमालाला सुरतची मोठी बाजार पेठ लाभेल. सुरत-नाशिक हा पेठ आणि सुरगाणा तालुक्यात जात असून तेथे इको टुरिझमला प्रचंड वाव आहे," असे गडकरी यांनी सांगितले.