निकेश शार्दुल, ठाणे
ठाणे पालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला होऊन दोन महिने उलटले नाही तरीदेखील फेरीवाल्यांची मुजोरी थांबण्याचं नाव घेत नाही. चितळसर येथे पालिका आयुक्तांच्या बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना गळा कापण्याची धमकी फेरीवाल्यांनी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
"एकाची बोटे छाटली आहेत, आता तुझी गर्दन उडवेन" अशी धमकी फेरीवाल्याने पालिकेचे कर्मचारी काशिनाथ राठोड यांना दिली. पातलीपाडा येथील शरणम् सोसायटी जवळ मोकळ्या जागेत फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. त्यामुळे पालिकेचे कर्मचारी कारवाई करण्यासाठी गेले असता खोबरे विकणारा फेरीवाला कर्मचाऱ्यावर संतप्त झाला. खोबरे कापण्यासाठी वापरणारा सुरा घेऊनच कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावला. सुदैवाने इतर कर्मचारी आले आणि राठोड बचावले. या प्रकाराचा धसका घेउन काशिनाथ राठोड हे दुसऱ्या दिवशी कामावरच आले नाहीत. या घटनेमुळे त्यांचा रक्तदाब वाढला आहे.
फेरीवाल्यांची मुजोरी कधी थांबणार? आणि फेरीवाल्यावर वरदहस्त कोणाचा आहे? हे प्रश्न आता निर्माण होत आहेत.