(Solapur Heavy Rain ) राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणासह पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. सोलापुरातील अक्कलकोट, बार्शी, मोहोळ तालुक्यात जोरदार पाऊस आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झालं आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यात सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आला असून पाण्याचा प्रवाह वाढल्याने सोलापूर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील सीना नदीच्या पुलावर दोन्ही बाजूने वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे.