आजही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून समुद्र खवळण्याची शक्यता आहे. आकाशात ढगाळ वातावरण असून, पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. मोठ्या उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता असल्याने समुद्र किनारी आणि समुद्रात लहान बोटी न घेऊन जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच अनेक जिल्ह्यात आज हवामान खात्याच्या अंदाजानुसार सकाळपासून संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. एकीकडे शेतकरी वर्गात पावसामुळे आनंदाचं वातावरण आहे, तर दुसरीकडे नागरीकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला असून कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ड जारी करण्यात आला आहे. दरम्यान आज कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, तसेच पालघर या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्याचसोबत कर्जत, बदलापूर, याठिकाणी देखील पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.