थोडक्यात
पुढील दोन दिवसांत पावसाची तीव्रता आणखी वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज
राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान
पालघर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी
(Palghar Heavy Rain) पुढील दोन दिवसांत पावसाची तीव्रता आणखी वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज वर्तवला आहे. मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या महाराष्ट्रभर पावसाचा जोर वाढत असून अनेक भागांमध्ये नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह सुरू असलेला मुसळधार पाऊस असाच सुरू राहिल्यास राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे.
याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरू आज पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट असल्याने पालघर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडू नका असा आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.