छत्तीसगडमधील बिजापूर येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत 5 जवानांना वीरमरण आलं आहे. तर, 21 जवान बेपत्ता झाले आहेत. याशिवाय 30 जण जखमी झाल्याचं वृत्तही समोर आलं आहे. छत्तीसगड पोलिसांच्या सूत्रांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
या चकमकीत केवळ जवान शहीद झाले नाहीत. तर नक्षलवाद्यांना ठार करण्यातही यश आलं असल्याचं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीवेळी घटनास्थळी 200 हून अधिक नक्षलवादी उपस्थित होते. या घटनेत जखमी जवानांना बाहेर काढण्यासाठी दोन एमआय 17 हेलिकॉप्टर आणण्यात आले होते. दरम्यान वीरमरण आलेल्यांमध्ये 2 छत्तीसगड पोलीस, 2 कोब्राचे जवान (CRPF) आणि 1 सीआरपीएफच्या बस्तरिया बटालियनचा जवान आहे.
या दुर्घटनेवर अमित शाह यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की मी छत्तीसगडमध्ये माओवाद्यांसोबतच्या लढ्यात वीरमरण आलेल्या शूर जवानांना नमन करतो. देश त्यांचं हे योगदान कधीच विसरणार नाही. मी त्यांच्या कुटुंबीयांसाठी सहानुभूती व्यक्त करतो. आपण शांती आणि प्रगतीविरोधातील या शत्रुंसोबतची लढाई सुरूच ठेवू. जखमींच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो, असंही ते म्हणाले.