(Indian Railway ) देशभरातील रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशभरातील 74 हजार डब्यांमध्ये आणि 15 हजार इंजिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास मंजुरी दिली आहे. रेल्वेमध्ये होणाऱ्या चोरी, वाद, गैरवर्तनाला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
प्रत्येक डब्यात डिजिटल निगराणी यंत्रणा सक्रिय करण्याचा निर्णय घेतला जाणार असून याअंतर्गत प्रत्येक कोचमध्ये आणि इंजिनमध्ये उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक डब्यात प्रवेशद्वाराजवळ दोन कॅमेरे असतील. याशिवाय, प्रत्येक कोचमध्ये चार 'डोम टाईप' सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. एक पुढील बाजूस, एक मागच्या बाजूस, आणि दोन्ही साइडमध्ये प्रत्येकी एक. तर प्रत्येक इंजिनमध्ये एकूण 6 कॅमेरे बसवले जाणार आहेत.
सध्या काही डब्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना लागू केली जाणार आहे. टप्प्याटप्प्याने इतर डब्यांमध्येही सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे.