(Indian Railway ) भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापूर्वी रेल्वेचा आरक्षण तक्ता (रिझर्वेशन चार्ट) प्रवासाच्या 4 तास आधी वेबपोर्टलवर प्रकाशित केला जात असे. मात्र, आता ही वेळ वाढवून आरक्षण तक्ता प्रवासाच्या 24 तास आधीच वेबसाईट व लॉगिन युजर इंटरफेसवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
या निर्णयामुळे देशभरातील कोट्यवधी प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. अनेक वेळा प्रवाशांना शेवटच्या क्षणी तिकीट बुक किंवा रद्द करायची गरज भासते. मात्र, 4 तास आधीच माहिती उपलब्ध असल्याने त्यांच्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण होत असे. आता 24 तास आधीच रिझर्वेशन चार्ट उपलब्ध झाल्याने तिकीट काढणे, रद्द करणे यासाठी अधिक वेळ मिळणार आहे.
याचा लाभ केवळ प्रवाशांनाच नाही, तर रेल्वे प्रशासनालाही होणार आहे. चार्ट 24 तास आधी तयार झाल्यामुळे रद्द झालेले तिकीट वेळीच इतर गरजू प्रवाशांना देता येणार आहे. त्यामुळे रिकाम्या जागा वाया जाण्याची शक्यता कमी होईल आणि प्रतीक्षा यादीतील प्रवाशांनाही संधी मिळेल. या उपक्रमाची सुरुवात पश्चिम रेल्वेच्या बिकानेर विभागात प्रायोगिक चाचणी म्हणून करण्यात येणार असून, त्यानंतर संपूर्ण देशभरात ही सेवा लागू करण्यात येईल.