थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या तिकिट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ २६ डिसेंबर २०२५ पासून लागू होणार असून, नववर्षाच्या आधीच प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
भारतीय रेल्वेच्या नव्या भाडे रचनेनुसार ऑर्डिनरी क्लासमध्ये २१५ किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे कमी अंतराच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मात्र, २१५ किलोमीटरहून अधिक अंतर प्रवास करणाऱ्यांना वाढीव भाडे भरावे लागणार असून, लांब पल्ल्याच्या प्रवासावरच या निर्णयाचा परिणाम जाणवणार आहे.
रेल्वेचा होणार मोठा फायदा
रेल्वे भाडेवाढीचा थेट फायदा भारतीय रेल्वेच्या महसुलावर होणार असून, या निर्णयामुळे उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. रेल्वे प्रशासनाच्या अंदाजानुसार सुमारे ६०० कोटी रुपयांपेक्षा अधिक अतिरिक्त महसूल मिळू शकतो. उदाहरणार्थ, नॉन-एसी गाडीतून ५०० किलोमीटर प्रवास करणाऱ्या प्रवाशाला आताच्या तुलनेत सुमारे १० रुपये अधिक भाडे मोजावे लागणार आहे.
दिल्ली ते पाटणा: किती वाढणार भाडे ?
दिल्ली ते पाटणा हे सुमारे १,००० किलोमीटरचे अंतर असून, DBRT राजधानी एक्सप्रेसच्या थर्ड एसी वर्गाचे भाडे आतापर्यंत अंदाजे २,१९५ रुपये होते. मात्र २६ डिसेंबर २०२५ पासून प्रति किलोमीटर २ पैशांची वाढ लागू झाल्यानंतर एकूण तिकिटदरात सुमारे २० रुपयांची भर पडणार आहे. त्यामुळे दिल्ली–पाटणा प्रवासासाठी प्रवाशांना आता अधिक भाडे मोजावे लागणार आहे.
दिल्ली ते मुंबईचा प्रवास महागणार
दिल्ली ते मुंबई हे सुमारे १,३८६ किलोमीटरचे अंतर आहे. सध्या सीएसएमटी राजधानी एक्सप्रेसच्या थर्ड एसी वर्गाचे भाडे अंदाजे ३,१८० रुपये आहे. मात्र नव्या भाडेवाढ नियमानुसार प्रति किलोमीटर २ पैशांची वाढ लागू केल्यानंतर तिकिट दरात सुमारे २७ रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे दिल्ली–मुंबई प्रवासासाठी 3AC तिकीट आता जवळपास ३,२०७ रुपये होणार आहे.
या वर्षी दुसऱ्यांदा झाली भाडेवाढ
यावर्षी रेल्वेने पहिल्यांदाच भाडेवाढ केली आहे असे नाही. याआधीही १ जुलै २०२५ रोजी ट्रेनच्या तिकिटदरात वाढ करण्यात आली होती. त्या वेळी मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या भाड्यात प्रति किलोमीटर १ पैशांची, तर एसी वर्गाच्या तिकिटांमध्ये प्रति किलोमीटर २ पैशांची वाढ लागू करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांवर यंदा पुन्हा एकदा अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
• मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या तिकिट दरात वाढ
• २१५ किमीपर्यंत ऑर्डिनरी क्लासला दिलासा
• लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अधिक भाडे
• यावर्षी रेल्वेकडून दुसऱ्यांदा भाडेवाढ लागू