संदीप गायकवाड, वसई | एसटी कर्मचा-यांच्या संपाला आज वसईत गाळबोट लागलं आहे. एसटी सेवा चालू ठेवल्याने एका अज्ञात इसमाने वाहकाच्या तोंडावर शाही फेक करत काळं फासल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहे.
राज्यभर एस.टी. कर्मचा-यांचा आपल्या विविध मागण्यासाठी सध्या संप सुरु आहे. शासनाने यावर तोडगा काढला असला तरी काही गट याविरोधात आहे. आज वसई एस.टी. डेपो हून सकाळी साढे सहा वाजल्यापासून वसई गाव ते वसई स्टेशन पर्यंत गाड्या सोडल्या होत्या. सकाळी पावणे नऊ वाजता वसई गावातून एक गाडी स्टेशन डेपो जवळ आली आणि त्यातील ड्रायव्हर कमलाकर वाघमारे हा सार्वजनिक टॉयलेटच्या इथे गेला. त्याचवेळी त्याच्याजवळ एक अज्ञात इसम आला आणि त्याने त्याच्या चेह-यावर शाही फेकली. आणि पळून गेला. वसईच्या नवघर डेपोच्या कंट्रोलरने याप्रकरणी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. सध्या माणिकपूर पोलीस याप्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर सध्या नवघर एसटी डेपोने आपली सेवा तात्पूरती बंद केली आहे.