जळगाव मधील एका महिला वसतिगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेनंतर विरोधकांकडून सत्ताधारी ठाकरे सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढण्यात आले होते. त्यांनतर या घटनेचे पडसाद विधानसभेत उमटल्यानंतर वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची समिती स्थापन करुन तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच समितीनेही तत्काळ तक्रारदार महिलेसह संबधितांचे जबाब घेण्यास सुरुवात केली आहे.
जळगावच्या आशादिप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व काही पुरुषांनी मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याची दुदैवी घटना घडली होती. या घटनेची तक्रार सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यानंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. सदर घटनेचे पडसाद विधानसभेत उमटल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या घटनेची गंभीर दखल घेत, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना समिती स्थापन करुन तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशानंतर तत्काळ चार महिलांची समिती स्थापन करून घटनास्थळी पाठवण्यात आली. या समितीच्या सदस्यांकडून तक्रारदार महिलेसह वसतीगृहातील अधिकारी व कर्मचारी तसेच अन्य महिला व मुलींचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. तसेच लवकरच याबाबतचा अहवाल वरिष्ठाकडे देण्यात येणार असल्याची माहितीही समिती अध्यक्षांनी दिली.
समितीत कोण ?
सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नेमण्यात आली. त्यांच्यासोबत डॉ. कांचन नारखेडे, पोलिस अधिकारी कांचन काळे यांच्यासह अन्य एका महिला डॉक्टर अधिकारी यांचा समावेश आहे.