(Jayakwadi Dam Water Level )मराठवाड्याच्या जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा रविवारी सायंकाळपर्यंत 83 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत केवळ 5 टक्के साठा असलेल्या धरणात यंदा दमदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे.
जायकवाडी धरणातील नाथसागर जलाशयात रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 18,965 क्यूसेक इतक्या वेगाने पाणी येत होते. धरणाच्या वरच्या भागात आणि उगम स्थानी सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ही मोठी आवक झाली आहे.
सध्या धरणाच्या उजव्या कालव्यातून 1,100 क्यूसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून डाव्या कालव्यातून पाणी सोडले जात नाही. जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता मंगेश शेलार यांनी सांगितले की, धरणाच्या आजूबाजूच्या क्षेत्रात पावसाचा जोर पूर्वी कमी होता. त्यामुळे खरीप पिकांसाठी पाण्याचा विसर्ग आवश्यक होता. मात्र, आता पावसाने जोर धरल्याने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार डाव्या कालव्याचा विसर्ग थांबवण्यात आला आहे.
पुढील काही दिवसांत धरणातून पाण्याचा विसर्ग हा पावसाच्या परिस्थिती आणि वरून येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार ठरवला जाणार आहे. रोजच्या रोज पर्जन्यमान व पाण्याची आवक लक्षात घेऊनच विसर्गाचे नियोजन करण्यात येईल, असेही शेलार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मराठवाड्यातील केवळ जायकवाडी नव्हे, तर अन्य दहा प्रमुख जलप्रकल्पांमध्येही साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. रविवारी सकाळपर्यंत या 11 प्रकल्पांमध्ये सरासरी 68 टक्के जिवंत साठा नोंदवण्यात आला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा केवळ 18 टक्के होता. त्यामुळे यंदा मराठवाड्यातील जलसाठ्याची परिस्थिती समाधानकारक असल्याचे स्पष्ट होत आहे.
धरण साठ्यात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिलासा निर्माण झाला असून खरीप पिकांसाठी आवश्यक पाण्याचा पुरवठा करता येणार आहे. यामुळे उत्पादनात वाढ होण्याची शक्यता असून, आगामी काळात योग्य जलव्यवस्थापन आणि नियोजनाची गरज असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.