काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाल्याचे विधान केले. मात्र हे विधान पूर्णतः खोटे, दिशाभूल करणारे आणि खोडसाळपणाचे असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राज्य सोशल मीडिया प्रमुख आणि कार्यकारिणी सदस्य जितरत्न पटाईत यांनी केला आहे.
या संदर्भात बोलतांना ते म्हणाले की, लोकांमध्ये एक भूमिका मांडायची आणि माध्यमांमध्ये दुसरीच माहिती देऊन संभ्रम निर्माण करायचा हा काँग्रेस पक्षाचा जुना खेळ पुन्हा सुरू झाला आहे. प्रत्यक्षात अद्याप कोणतीही युती जाहीर झालेली नसताना अशा प्रकारची विधाने करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
काही दिवसांपूर्वी दिल्लीहून काँग्रेसच्या एआयसीसीचे प्रतिनिधी व्ही. व्यंकटेश हे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्या भेटीत वंचित बहुजन आघाडीने युतीबाबत “सकारात्मक भूमिका” मांडली होती. मात्र, त्यानंतरही काँग्रेसकडून कोणताही ठोस, अधिकृत किंवा सन्मानजनक प्रस्ताव न आल्याने युतीसंदर्भात कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.
“तरीसुद्धा काँग्रेसकडून माध्यमांमध्ये चुकीची माहिती दिली जात आहे. हे दुर्दैवी असून लोकांची दिशाभूल करणारे आहे". वंचित बहुजन आघाडीच्या सर्व मतदारांना आणि समर्थकांना उद्देशून असेही सांगण्यात आले आहे की, “सध्या तरी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात कोणतीही अधिकृत युती जाहीर झालेली नाही. यासंदर्भातील अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते योग्य वेळी अधिकृतरीत्या जाहीर करतील, अशीही माहिती जितरत्न पटाईत यांनी दिली आहे.