महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कोल्हापूरच्या राजकारणातील प्रभावशाली घटना घडली आहे. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ यांचा मुलगा नाविद मुश्रीफ यांची निवड झाली आहे. त्यामुळे सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गोकुळवर कोणाचा ताबा असणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अध्यक्षाच्या निवडीआधीच नाविद मुश्रीफ हे गुरुवारीच परदेशातून कोल्हापुरमध्ये दाखल झाले होते.
दरम्यान नविद यांच्या निवडीला हसन मुश्रीफ यांनी विरोध केला होता. मात्र, त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यामुळे गोकुळमध्ये राज्यपातळीवरील हस्तक्षेप दिसून आला. गोकुळ दूध महासंघाच्या माध्यमातून कोल्हापूरमधील ग्रामीण भागात वर्चस्व मिळवण्याची एक संधी निर्माण होते. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी याबाबत विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. गोकुळमध्ये सत्तेत असलेले नेते हसन मुश्रीफ यांच्यावरच समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
दरम्यान आता कोल्हापूर जिल्हा बँक आणि गोकुळ अध्यक्षपदी आता मुश्रीफ यांची सत्ता आल्याने राजकारणात एक वर्चस्व वाढले आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ आहेत.