(Kolhapuri Slippers) कोल्हापुरातील पारंपारिक चप्पलांना मोठी ओळख मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड प्राडा आणि महाराष्ट्रातील लिडकॉम तसेच कर्नाटकातील लिडकार यांच्यात मुंबईत महत्त्वाचा करार झाला. या करारानंतर 26 फेब्रुवारीपासून प्राडाच्या जगभरातील अंदाजे 40 दुकानांमध्ये कोल्हापुरी चप्पल ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत. पारंपारिक चर्मकला आधुनिक डिझाइनसोबत जगभर पोहोचवण्याचा हा उपक्रम मानला जात आहे.
कारागिरांच्या परंपरेला मोठा सन्मान
लिडकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले की, हा उपक्रम अनेक महिन्यांच्या चर्चेचा परिणाम असून तो कोल्हापुरी चप्पल तयार करणाऱ्या पिढ्यान्पिढ्या काम करणाऱ्या कारागिरांना योग्य मान देणारा आहे. प्राडासारखा जागतिक ब्रँड थेट कारागिरांशी काम करत असल्याने त्यांच्या कौशल्याला योग्य ओळख मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारलाही हा उपक्रम पाठिंबा देताना आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नाटकातील कारागिरांसाठीही नवा मार्ग
लिडकारच्या व्यवस्थापकीय संचालिका वसुंधरा यांनी सांगितले की, कोल्हापुरी चप्पल हा महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतील कारागिरांचा जुना वारसा आहे. जीआय टॅगमुळे त्यांचे वैशिष्ट्य टिकून राहिले आहे. प्राडासोबतची भागीदारी कारागिरांना प्रशिक्षण, रोजगार आणि जागतिक बाजारपेठेत नवीन संधी उपलब्ध करून देईल.
‘मेड इन…’ प्रकल्पाचा पुढचा टप्पा
हा करार प्राडाच्या “मेड इन…” या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचा नवा भाग आहे. विविध देशांतील कारागिरांना जगभरात स्थान मिळावे, त्यांच्या कौशल्याला प्रोत्साहन मिळावे, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
कोठे तयार होतात कोल्हापुरी चप्पल?
पारंपारिक कोल्हापुरी चप्पल महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांत तसेच कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट, धारवाड आणि विजापूर येथे तयार होतात. 2019 मध्ये चप्पलांना जीआय टॅग मिळाल्याने त्यांना अधिकृत मान्यता आणि वैशिष्ट्य प्राप्त झाले. कोल्हापुरी चप्पल आता प्राडाच्या माध्यमातून जागतिक मंचावर झळकणार आहेत आणि हे कोल्हापूरसह दोन्ही राज्यांतील कारागिरांसाठी मोठे यश ठरणार आहे