राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होताच कोकणातील राजकारण पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलं आहे. मालवणपासून कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ले, चिपळूण, रोहा, खेड ते माथेरानपर्यंतच्या निकालांनी अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं स्पष्ट केलं आहे. विशेषतः राणे बंधूंमधील संघर्ष, आरोप-प्रत्यारोप, पोलिस कारवाई आणि न्यायालयीन लढाया या साऱ्याची परिणती थेट निवडणूक निकालांतून दिसून आली.
मालवण : आरोप, कारवाया आणि संघर्षानंतर निलेश राणेंचा विजय
मालवण नगरपरिषद निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न राहता ती थेट निलेश राणे विरुद्ध नितेश राणे अशी राजकीय लढाई बनली होती. प्रचारादरम्यान शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजपावर पैसे वाटपाचा आरोप करत ‘स्ट्रिंग ऑपरेशन’ केल्याचा दावा केला होता. यानंतर पोलिसांनी भाजप कार्यकर्त्याच्या वाहनातून रोकड जप्त केल्याने राजकीय वातावरण अधिकच तापलं. इतक्यावरच न थांबता, भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत निलेश राणे न्यायालयात गेले. या सगळ्या घडामोडींमुळे मालवणमध्ये निवडणूक प्रतिष्ठेची आणि प्रतिष्ठानं ठरवणारी बनली होती.
निकालानंतर मात्र चित्र स्पष्ट झालं :
मालवण नगरपरिषद निकाल
शिवसेना (शिंदे गट) – 10 जागा
भाजप – 5 जागा
या निकालासह मालवण नगरपरिषदेवर शिंदे गटाची सत्ता प्रस्थापित झाली. निवडणुकीची सूत्रे भाजपकडून नितेश राणेंनी हातात घेतली असतानाही पराभव पत्करावा लागल्याने त्यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. तर दुसरीकडे निलेश राणेंनी विजयाचा गुलाल उधळत आपली पकड अधिक मजबूत केली.
सावंतवाडी : भाजपाची आघाडी, केसरकरांची प्रतिष्ठा पणाला
सावंतवाडी आणि वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकांमध्ये शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र सावंतवाडीत भाजपाने बाजी मारली.
भाजप – 11
शिवसेना (शिंदे गट) – 7
काँग्रेस – 1
शिवसेना (ठाकरे गट) – 1
नगराध्यक्षपदी भाजपाच्या श्रद्धा राजे भोसले तब्बल 900 मतांनी विजयी झाल्या.
वेंगुर्ले : भाजपाचं निर्विवाद वर्चस्व
वेंगुर्ले नगरपरिषदेत भाजपाने एकतर्फी वर्चस्व सिद्ध केलं.
भाजप – 16
शिवसेना (ठाकरे गट) – 3
शिवसेना (शिंदे गट) – 1
नगराध्यक्षपदी भाजपाचे राजन गिरफ 430 मतांनी विजयी झाले.
कणकवली : बालेकिल्ल्यात भगदाड, नगराध्यक्ष मात्र भाजपबाहेर
कणकवलीत नितेश राणेंविरोधात सर्वपक्षीय शहर विकास आघाडी उभी राहिली. या आघाडीला निलेश राणेंचा पाठिंबा मिळाल्याने ‘राणे विरुद्ध राणे’ संघर्ष अधिक तीव्र झाला.
भाजप – 9 जागा
शहर विकास आघाडी – 8 जागा
विशेष म्हणजे भाजपाचे अधिक नगरसेवक असतानाही नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे संदेश पारकर 145 मतांनी विजयी झाले. हा निकाल नितेश राणेंसाठी धक्कादायक ठरला.
चिपळूण, रोहा, खेड आणि माथेरान : स्थानिक राजकारणाला नवी दिशा
चिपळूणमध्ये शिवसेनेचे उमेश सकपाळ नगराध्यक्ष झाले असून येथे शिवसेना-भाजपमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली. रोहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जवळपास सर्व प्रभागांत वर्चस्व राखत आपली ताकद सिद्ध केली. खेड नगरपरिषदेत शिवसेनेच्या माधवी बुटाला नगराध्यक्ष झाल्या असून शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवलं. माथेरानमध्ये शिंदे गट, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात मिश्र निकाल लागले असून स्थानिक राजकारण अधिक रंगतदार झालं आहे.
कोकणात सत्तासमीकरणं बदलली
या नगरपरिषद निकालांनी कोकणातील राजकारणाला नवी दिशा दिली आहे. काही ठिकाणी भाजपाचं वर्चस्व कायम राहिलं, तर काही ठिकाणी शिंदे गटाने ताकद दाखवली. मात्र मालवण आणि कणकवलीतील निकालांनी राणे कुटुंबातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उघडपणे समोर आणला असून, येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा राजकारणासाठी हे निकाल संकेत देणारे ठरत आहेत.