थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या हप्त्यावरून राजकीय वाद तापला आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून महापालिका निवडणूक संपल्यानंतरच या योजनेची रक्कम महिलांना देण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडते. डिसेंबर २०२५ चा हप्ता अद्यापही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन महिन्यांचे एकत्रित ३,००० रुपये १४ किंवा १५ जानेवारीला जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
येत्या गुरुवारी, म्हणजे १५ जानेवारीला महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ अशा दोन महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे जमा करण्याचा विचार आहे. नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरअखेरीस जमा झाला असल्याने, हा निर्णय १ कोटीहून अधिक महिला मतदारांना प्रभावित करेल आणि निवडणुकीच्या दिवशी सत्तारूढ पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्यास प्रवृत्त करेल, असा आक्षेप काँग्रेसने घेतला आहे.
काँग्रेसने पत्रात ही बाब एक प्रकारची ‘लाचारी’ असल्याचे सांगितले असून, यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे निवडणूक संपल्यानंतरच योजनेचे पैसे देण्याचे निर्देश आयोगाने शासनाला द्यावेत, अशी विनंती केली आहे. निवडणूक आयोगाने या पत्राची गांभीर्याने दखल घेतली असून, तक्रारीवर विचार करू, असे उत्तर दिले आहे. यामुळे लाडक्या बहिणींच्या हप्त्याला ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
काँग्रेसच्या या पत्रावर भाजपने तीव्र संताप व्यक्त केला आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींबद्दलचा द्वेष काँग्रेसमध्ये ठासून भरलेला आहे. तो वरचेवर उफाळून येतो. आमच्या माता-भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद काँग्रेसला आणि त्यांच्या नेत्यांना बघवत नाही. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली, त्यावेळीच काँग्रेस समर्थक कार्यकर्त्याने हायकोर्टात याचिका दाखल करून ही योजना बंद करावी, अशी मागणी केली होती.” आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यावरून काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवला.
निवडणुकीपूर्वी पैसे देणे आचारसंहितेचा भंग असल्याचा काँग्रेसचा दावा.
भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर तीव्र टीका केली.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर पुढील घडामोडी अवलंबून.