वारणा नदीत रविवारी मगरीचे मृत पिल्लू आढळले होते. हे प्रकरण ताजे असतानाच, काल उदगाव अंकली पुलाखाली कृष्णा नदीमध्ये एक महाकाय मगर मृत अवस्थेत पाण्यावर तरंगताना आढळून आली. उदगाव येथील मच्छीमारांनी या घटनेची माहिती कोल्हापूर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. मात्र, मगर पाण्याने वाहत गेल्याने मृत मगर तिथे आढळून आली नाही. त्याऐवजी, या मृत मगरीचा व्हिडीओ काही तरुणांनी आपल्या कॅमेरात कैद केला.
रविवारी वारणा नदीत मगरीच्या पिल्लाचा आणि माशांचा दुधगाव, कवठेपिराण येथे मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने संयुक्तपणे पाहणी केली. यावेळी वारणा आणि कृष्णा नदीतील पाण्याचे जागोजागी नमुने घेतले गेले. या नमुन्यांच्या प्राथमिक तपासणीत नदीच्या पाण्यात मळी मिश्रित पाणी सोडण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, मगरीच्या पिल्लांच्या आणि माशांच्या मृत्यूला संबंधित कारखान्यांचे मळी मिश्रित पाणी कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.